
थायलंडहून उड्डाण केलेल्या अजूर एअरच्या बोइंग 757 विमानाला चीनच्या हवाई हद्दीत असताना अचानक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. उड्डाणानंतर साधारण चार तासांनी वैमानिकाने ‘डिस्ट्रेस सिग्नल’ जारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विमानात एकूण 238 प्रवासी आहेत. तांत्रिक बिघाडामुळे विमानाची सुरक्षितता धोक्यात आल्याचे लक्षात येताच वैमानिकाने जवळच्या विमानतळाशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आता चीनमधील लान्झू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. रशियन आणि चीनी सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फ्लाइट संख्या ZF-2998 मध्ये उद्भवलेल्या संकटामुळे लान्झू विमानतळावर आपत्कालीन यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. विमानाचे सुरक्षित लँडिंग व्हावे यासाठी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
अजूर एअरच्या प्रेस सर्व्हिसने निवेदनात म्हटले आहे की, विमान सध्या आपत्कालीन लँडिंगसाठी सज्ज असून कंपनीचे तांत्रिक विभाग परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, विमानतळावरील लँडिंगची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

























































