
चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर हे धरण आकाराला येणार आहे. या कामाचे भूमिपूजन चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. तब्बल 167 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 12 लाख कोटी खर्चून हे धरण बांधण्यात येत आहे. दरम्यान या धरणामुळे आसपासच्या भागात भूस्खलन आणि भूपंपाचे धक्के जाणवू शकतात. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे धरणाला हिंदुस्थानचा विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून चीनने धरणाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद आणखी चिघळणार आहे.
अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जात असून या धरणामुळे हिंदुस्थान आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पात पाच केंस्केड जलविद्युत केंद्रे असतील. या प्रकल्पातून दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट तासांहून अधिक वीज निर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तब्बल 30 कोटी नागरिकांच्या गरजा पूर्ण करू शकणार आहे. हे धरण म्हणजे चीनचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हिंदुस्थानसह शेजारील देशांशी स्पर्धा करण्याच्या आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे धरण बांधण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
2015 मध्ये चीनने तिबेटमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सचा जामे जलविद्युत प्रकल्प सुरू केला. तेव्हाही हिंदुस्थानने चिंता व्यक्त केली होती. चीन हळूहळू ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी आणि दिशा आपल्या ताब्यात घेऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
काँग्रेसचे मोदींना सवाल
1. चीनच्या या षड्यंत्रावर मोदी सरकार मूग गिळून गप्प का आहे?
2. या धरणाशी संबंधित माहिती मोदी सरकार चीनकडून का मागवत नाही.
चीनला उत्तर द्यावेच लागेल
गेल्या अनेक वर्षांपासून चीनच्या सीमेवर कुरापती सुरूच आहेत, परंतु चीनवर डोळे वटारण्याची भाषा करणारे मोदी गप्प आहेत. चीनला उत्तर द्यावेच लागेल, शेवटी हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
हा वॉटरबॉम्ब ठरेल!
ब्रह्मपुत्रा नदी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांची लाईफलाईन आहे. या नदीवर चीनने जगातील सर्वात मोठे धरण बांधले तर नदीचा प्रवाह पुर्णपणे चीनच्या ताब्यात जाईल. या धरणाचा वापर चीन हिंदुस्थानविरोधात वॉटर बॉम्बसारखा करेल, अशी भीती काँग्रेसने ‘एक्स’वरून केलेल्या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडवून ईशान्येकडील राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण करण्याचा चीनचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.