
चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. चिनी सैन्याने तैवानच्या सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. तैवानच्या एका अधिकाऱयाने चीनवर आपल्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, चीनची 12 विमानवाहू जहाजे आणि 14 पाणबुडय़ा तैवानच्या सीमेवर दिसून आल्या. 153 विमानांपैकी 111 विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केला. चीनच्या हालचालींमुळे तैवानमध्ये चिंता वाढली असून, परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. तैवान चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना लागू करत आहेत. तैवाननेही विमाने आणि लढाऊ जहाजे सज्ज ठेवली आहेत.
काय आहे वाद?
चीनने तैवानला त्यांचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र तैवानच्या म्हणण्यानुसार ते लोकशाही पद्धतीने शासित असून एक स्वतंत्र देश आहे. चीनच्या या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये सतत संघर्षाचे वातावरण असते. तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांच्या म्हणणण्यानुसार, त्यांनी चीनच्या दाव्यांना विरोध केला आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला तैवानचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चीन आणखी संतप्त झाला आहे.