
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात तयार केल्याचा तसेच एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायदा, अॅट्रोसिटी अॅक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा शिक्षक अवघ्या दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होता.
पांडुरंग गोविंद डाकरे (वय 57, रा. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी डाकरे याने वाईट उद्देशाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांना अश्लील स्वरूप दिले. यामध्ये एका पालक महिलेचाही समावेश आहे. यासोबतच त्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशीही गैरवतन केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार पालकांसह ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाला त्यांनी जाब विचारला. यानंतर याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करीत आहेत.





























































