चर्चगेट-विरार AC ट्रेनमध्ये प्रवाशांकडून TTE ला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे दंड मागितल्याने चर्चगेट-विरार एसी लोकलमध्ये टीटीईला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत टीटीई जसबीर सिंग यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर जीआरपी आणि आरपीएफने मारहाण करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढत दंड भरायला लावला. तसेच सिंग यांची माफीही मागायला लावले.

काय घडलं नेमकं?

अनिकेत भोसले हा प्रवासी शुक्रवारी चर्चगेट ते विरार एसी लोकलने प्रवास करत होता. यावेळी टीटीई जसबीर सिंग यांनी भोसलेला तिकिट दाखवण्यास सांगितले. भोसले याने दाखवलेले तिकिट अवैध असल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी त्याला भारतीय रेल्वे नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. मात्र भोसलेने दंड भरण्यास नकार दिला. यावरुन सिंग आणि भोसले यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

गाडी बोरीवली स्थानकात येताच सिंग यांनी भोसलेला खाली उतरण्यास सांगितले. मात्र भोसले आणि इतर प्रवाशांनी सिंग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सिंग यांना अपशब्द वापरले, त्यांचा शर्ट फाडला. यानंतर जीआरपी आणि आरपीएफने तात्काळ धाव घेत मारहाण करणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढले. आरोपींना सिंग यांची माफी मागायला लावली. तसेच आोरपींनी लेखी माफीही दिली आणि नियमानुसार दंडही भरला.