‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर, गंज काढून वाढवले जलवाहिनीचे आयुर्मान; कुर्ला येथील जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

कुर्ला येथील साकीनाका खैरानी रस्त्यावरील 800 मीटर लांब लोखंडी जलवाहिनीची दुरुस्ती अत्याधुनिक ‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या गळतीला कारणीभूत ठरलेला गंज टप्प्याटप्प्याने काढून गळती पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या जलवाहिनीची क्षमता आणि आयुर्मानदेखील वाढले आहे. दरम्यान, अरुंद जागेत असलेली ही जलवाहिनी टप्प्याटप्याने दुरुस्त केल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवता आला.

कुर्ला येथील खैरानी रस्ता येथे सुमारे 30 वर्षांपासून असलेल्या भूमिगत 1,200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून (असल्फा आऊटलेट) मागील काही दिवसांपासून गळती सुरू होती. खैरानी रस्ता हा अतिशय अरुंद आणि वाहतुकीची वर्दळ असलेला आहे. त्याबरोबर एल विभागात संघर्षनगर, लॉयलका पंपाऊंड, सुभाषनगर, भानुशालीवाडी, यादवनगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णीवाडी, डिसुझा पंपाऊंड, लक्ष्मी नारायण रस्ता, जोशनगर, आजाद मार्पेट यासह अनेक परिसराला या जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सलग हाती घेणे शक्य नव्हते. मात्र, जलवाहिनीची गळती शोधून दुरुस्ती करणे आवश्यक होते.

गैरसोय टाळून काम केले फत्ते

उपजल अभियंता (देखभाल) विभागातील कुशल अभियंता आणि कामगारांनी प्रत्येक शनिवारी सुमारे 80 मीटर लांब जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरण काम केले. अशा प्रकारे सलग 10 शनिवारी काम करून संपूर्ण 800 मीटर मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. खैरानी रस्ता जलवाहिनीवर दर शनिवारी याप्रमाणे दहा आठवडे शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून टप्प्याटप्प्याने जलवाहिनी दुरुस्ती काम हाती घेतले. अखेर शनिवार 27 मे रोजी हे काम पूर्ण झाले. रहिवाशांची गैरसोय टाळून ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

कधी केला जातो सीआयपीपीचा वापर

 ज्या भागातील जलवाहिनी भौगोलिक आणि वाहतुकीच्या कारणास्तव बदलणे शक्य नसते, अशा ठिकाणी क्युअर इन प्लेस्ड पाइप (सीआयपीपी) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
 अनेक वर्षे सततच्या वापरामुळे जलवाहिन्यांना गंज चढतो. त्यामुळे पाणी वाहून नेण्यात अडथळा निर्माण होतो आणि जलवाहिनीला गळली लागते.
 असल्फा आऊटलेटमध्येही हीच समस्या होती. त्यामुळे सुरुवातीला या जलवाहिनीतील गंज पूर्णपणे काढून नंतर त्यावर रासायनिक पदार्थांचा मुलामा देण्यात आला.
 नंतर जलवाहिनीतून रबरी आवरण सोडून त्यात हवा भरण्यात आली. हवा भरल्यानंतर हे रबरी आवरण जलवाहिनीला चिकटले. हे आवरण चिकटल्यानंतर हवा काढण्यात आली. यालाच सीआयपीपी तंत्रज्ञान म्हणतात. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण करण्यात आले.