अनेक पिढ्यांची साक्ष देणाऱ्या कडुलिंबाचे पुरातन झाड अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा पर्यावरणप्रेमींनी निषेध केला आहे. तर, सामाजिक संघटनांनी आंदोलन करीत या घटनेला जबाबदार असणारे बापू सदाशिव मैड (रा. गदादेनगर, कर्जत) याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्जत शहरातील बाजारतळ येथे शंभर वर्षांचे जुने कडुलिंबाचे झाड आहे. या झाडाखाली बसून अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. हजारो नागरिकांना उष्णतेमध्ये आपली शीतल छाया दिली. मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी झाड जाळण्याच्या घटनेबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शेकडो वर्षे अनेकांना सावली देणारा कडुलिंब अनेकवेळा प्रयत्न करूनही नष्ट होत नाही, हे पाहून त्याच्यावर ऍसिड टाकून ते जाळण्याचा प्रकार करण्यात आला आहे. सर्वप्रथम खोडाची वरपर्यंत साल काढली आहे. त्यानंतर ड्रिल मशीनने झाडाला अनेक ठिकाणी छिद्र पाडून त्यामधून ऍसिड ओतण्यात आले आहे. यामुळे ऍसिड सर्वत्र पसरले असून, कडुनिंबाचे झाड जळू लागले आहे.
या घटनेची नगरपंचायत, वन विभाग, पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषी व्यक्तीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांना, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दरम्यान, कारवाई झाली नाही तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.