
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करीत आठवडाभरात हजारो मुंबईकर रेल कामगार सेनेच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेद्वारे मुंबईकरांची भावना सरकारदरबारी पोहचवली जाणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
सीएसएमटीच्या उपनगरी लॉबीसमोर रेल कामगार सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी मोठ्या जल्लोषात साजरा झालेल्या शिवजन्मोत्सव (तिथीनुसार) सोहळ्यावेळी ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर आठवडाभर अखंडितपणे मुंबईकरांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. रोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या सीएसएमटी स्थानकात येणारे प्रवासी उत्स्फूर्तपणे मोहिमेत सहभागी होत आहेत. पहिल्याच दिवशी 10 हजारांहून अधिक शिवप्रेमींनी स्वाक्षरी करून भरभरून प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याकामी आता आणखी विलंब होताच कामा नये. ही आम्हा मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे रेल कामगार सेनेच्या लढ्याला यश मिळेपर्यंत साथ देणार, अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी देत आहेत. रेल कामगार सेनेच्या रनिंग व ट्राफिक ब्रँचच्या वतीने पुढील आठवड्याच्या सोमवारपर्यंत ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.





























































