
आर्थिक समस्या आणि घरगुती भांडणातून एका व्यावसायिकाने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. चौघांनाही सुखरुप वाचवण्यास यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मीरपेट पोलिसांनी कुटुंबीयांसमोर पती-पत्नीचे समुपदेशन केले आहे.
सदर 40 वर्षीय इसम हैदराबादमधील बीएन रेड्डी नगर परिसरात पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने तो चिंतेत होता. यावरून बुधवारी सकाळी पत्नीशी त्याचे कथित भांडण झाले.
यानंतर मॉर्निंग वॉकला जातो सांगून तीन मुलांसह कारने तो घरातून निघून गेला. कार घेऊन तो अब्दुल्लापूरमेट येथील इमामगुडा तलावाजवळ आला. मात्र गाडी तलावाजवळ न थांबवता थेट तलावात वळवली.
कार पाण्यात जायला लागल्यानंतर मुलांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या काचा खाली करून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक सतर्क झाले. नागरिकांनी तात्काळ तलावाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले.
नागरिकांनी चौघांनाही सुखरुप वाचवले आणि मीरपेट पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर कारही पाण्यातून बाहेर काढण्यात आली. मीरपेट पोलिसांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत जोडप्याचे समुपदेशन केले असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तसेच चौघांना वाचवल्याबद्दल पोलिसांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.