
हिंदुस्थानचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्याविरोधात अपुऱ्या माहितीवर मिटकरी यांनी केलेल्या विधानांचे पडसाद आज ठाण्यात उमटले. सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली व अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
मध्यवर्ती संस्थेचे रामानंद सुळे, अतुल फणसे, गिरीश राजे, विकास देशमुख, जयदीप कोरडे, राजीव प्रधान, विनय चौबळ, शिरीष गडकरी, दीपक फणसे, नागेश कुळकर्णी, यशवंत रणदिवे, किशोर राजे, नितीन वैद्य, प्रकाश दिघे, तेजस राजे, राधिका गुप्ते, योगिनी चौबळ, पूजा सुळे यांच्यासह शेकडो समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
बदनामी सहन करणार नाही
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फ अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला. ‘राजसंन्यास’ नाटकातील घटना व प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले. मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यात व तालुकास्तरावर निदर्शने व निवेदने देण्यात येणार असल्याचे समीर गुप्ते यांनी जाहीर केले.