
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या आजच्या निर्णायक दिवशी अभूतपूर्व राडा झाला. दोन दोन मंत्र्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या सदस्यांना खेचून घेण्याच्या प्रकारावेळी झालेल्या झटापटीत खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले. अशा तप्त वातावरणात बहुमत गाठीशी नसतानाही भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष व शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी राजूभय्या भोसले यांची निवड झाली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडणूकपूर्व युती केलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाला मिळून 35 जागा मिळाल्या होत्या. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी पुरस्कृत एक पक्ष व काँग्रेसच्या एका सदस्याचा त्यांना पाठिंबा होता. 65 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 33 सदस्यांची आवश्यकता असताना या युतीकडे 37 सदस्य होते. दुसरीकडे भाजपला 27 जागा मिळाल्या होत्या. तरीही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा भाजपचा अट्टहास होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपकडून दगाफटक्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाच्या सदस्यांना सहलीवर पाठवले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही फिल्डिंग लावली होती. मात्र, अखेरच्या दोन दिवसांत भाजपने गेम फिरवला. मात्र या निवड प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
एसपी तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी
या प्रकरणात भाजपने पोलीस आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करत सत्ता बळकावली आहे. जिह्यातील जनता या नीचपणाचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. भाजपने सुरुवात केली आहे, मात्र शेवट आम्ही करू, असा निर्वाणीचा इशारा शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष दांडगाईचा प्रकार घडल्यामुळे जिल्हा प्रशासनावर आणि पोलिसांवर एफआयआर दाखल करणार आहोत. जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.



























































