जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर देशातील अनेक राज्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.

मान्सून काळासाठीच्या दीर्घकालीन अंदाजाची माहिती हवामानशास्त्र विभागाचे डॉ. डी. शिवानंद पै यांनी शुक्रवारी दिली. देशभरात सरासरीइतका म्हणजे 96 टक्के पाऊस पडेल. मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानात सरासरीइतका पाऊस पडेल तर ईशान्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज डॉ. पै यांनी वर्तवला आहे. जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

देशभरात पूर्व मोसमी पाऊस सरासरीपेक्षा 12 टक्के अधिक, तर मेमध्ये सरासरीपेक्षा 8 टक्के अधिक पाऊस पडला. ईशान्य हिंदुस्थानात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटा कमी आल्याचे पै यांनी सांगितले.