
लोअर परेलच्या जुन्या पुलाच्या जागी उभारलेल्या नवीन पुलावरील दोन बस थांबे बंद केल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना बेस्ट बससाठी दूरपर्यंत चालावे लागत आहे. यात वृद्ध नागरिक व महिलांचे अधिक हाल होत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्या पुलाच्या दोन्ही टोकांवर वरळी, दादर दिशेला जाण्यासाठी बस थांबे होते. या थांब्यांमुळे रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी, माधव भुवन परिसरातील नागरिक तसेच डिलाईल रोड व करी रोड भागातील प्रवाशांची चांगली सोय होत होती. नवीन पुलावर दोन्ही बस थांबे गायब झाल्याने लोअर परेल परिसरातील नागरिक, विद्यार्थी व कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना बेस्ट बससाठी खूप चालावे लागत आहे. दोन्ही बस थांबे पूर्ववत ठेवण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. त्याची अद्याप दखल घेतली न गेल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.