
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटीमुळे अनेक हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. सहस्त्रधारा येथे रात्री ११ वाजता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी झाल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, मुख्य बाजारपेठेत मातीचा ढिगारा पडल्याने २ ते ३ मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा ११:३० च्या सुमारास ढगफुटीसारखी घटना घडली. सहस्त्रधाराच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ढिगारा आला आहे. यामुळे दोन ते तीन मोठ्या हॉटेल्सचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजारातील सुमारे ७ ते ८ दुकानांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी सुमारे १०० नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. एक ते दोन नागरिक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे, परंतु त्याची पुष्टी झालेली नाही.
आपत्ती नियंत्रण कक्षाकडून पहाटे २:०० वाजता माहिती मिळाली की एसडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले आहेत. परंतु वाटेत मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असल्याने पथक घटनास्थळी पोहोचू शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेसीबी घटनास्थळी पोहोचले आहे आणि रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे, असे सांगण्यात आले.
डेहराडूनमध्ये रात्री उशिरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आयटी पार्कमध्येही मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे सोंग नदीच्या पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. पोलिसांनी जवळपास राहणाऱ्या लोकांना सतर्क केले आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे मसुरीमध्येही मुसळधार पावसात एका मजुराचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मजुराला उपचारासाठी रुग्णालयात नेले.