
गरीब, गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळवायची असेल तर यापुढे फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कारण कागदी अर्ज स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही यंत्रणा हायटेक करण्याचा सरकारचा विचार सद्यस्थितीला धरून असला तरी ग्रामीण भागांतील अशिक्षित रुग्णांचे मात्र वांधे होणार आहेत. ग्रामीण भागात आजही अनेकांकडे मोबाईल पह्न, संगणक, लॅपटॉप नाहीत, अनेक भागांमध्ये इंटरनेटचीही अडचण आहे. त्यामुळे मदत मिळवायची कशी अशी चिंता त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने जुनी कागदी अर्ज पद्धत पूर्णपणे बंद केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारी कार्यालयांमध्ये मदतीसाठी हेलपाटे घालावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पोर्टल बनवण्यात आले असून त्यावर अर्जांची छाननी तातडीने होऊन मदतीची रक्कम थेट रुग्णालय किंवा संबंधित खात्यावर जमा होणार आहे.
या नवीन पोर्टलवर सर्व संबंधित रुग्णालयांना आता अधिकृत ई-मेल आयडीची नोंदणी करून ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रुग्णालयाला ‘ई-केवायसी’ प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल. त्याशिवाय या पोर्टलवर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्जामुळे सरकारी कार्यालयांच्या सतत चकरा माराव्या लागणार नसल्या तरी ग्रामीण भागात हे ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी होत आहे.
























































