सीएनडी वेस्ट प्रकल्पाचा मार्ग मोकळा, वसईतील राडारोड्याचा प्रश्न मार्गी; जीवन प्राधिकरणाची मंजुरी

वसई-विरार शहरात बांधकामाचा निघणाऱ्या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोखीवरे येथे सीएनडी वेस्ट प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक परवानगीअभावी रखडला होता. अखेर त्या परवानग्या मिळाल्या असल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे. मुंबई, ठाणे या शहरांना लागूनच वसई-विरारचा परिसर आहे. शहरात महामार्ग व मोकळ्या ठिकाणी बांधकामे तोडलेला राडारोडा आणून टाकला जात आहे.

विशेषतः हा कचरा मुख्य रस्त्याच्या कडेला व रहदारी असलेल्या मार्गात टाकला जात असल्याने शहर विद्रुप होत आहे. याशिवाय सनसिटी, नालासोपारा श्रीप्रस्थ रस्ता, विरार रस्ता यासह अन्य ठिकाणच्या भागातही राडारोडा, कचरा टाकला जात आहे. या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी सीएनडी वेस्ट प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

12 कोटी खर्च
सीएनडी वेस्ट प्रकल्प 150 ते 200 मेट्रिक टन क्षमतेचा असून यासाठी 12 कोटी रुपये निधी खर्च पडणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी जागेचा शोध सुरू होता. मात्र जागाच उपलब्ध होत नसल्याने अखेर वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील कचराभूमीवरच पाच एकर जागेत पालिका हा प्रकल्प उभारणार आहे.