अतिशहाणपणाचा ‘बॉम्ब’ फुटला; विमानतळावर केलेली मस्करी महागात पडली, प्रवाशाला थेट अटकच झाली

कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाला अतिशहाणपणा महागात पडला आहे. या प्रवाशाला एअर इंडियाच्या एआय 682 विमानातून मुंबईला जायचे होते. त्याने एक्सरे बॅगेज इंस्पेक्शन सिस्टम चेकपॉईण्टवर चेकिंगदरम्यान सीआयएसएफ अधिकाऱ्याला माझ्या बॅगेत ब़ॉम्ब आहे का विचारले आणि त्याला ते चांगलेच महागात पडले. त्याला पोलिसांनी विमानतळावरच बेड्या घातल्या.

मनोज कुमार (42) असे त्या प्रवाशाचे नाव आहे.कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, तपासा दरम्यान मनोज कुमारने शहाणपणा करत सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले की, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? या वक्तव्यावर अधिकारी गोंधळले आणि त्यांनी विमानतळ सुरक्षा पथकाला त्वरीत त्यावर कारवाई करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी तत्काळ बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्वॉडला बोलावून घेतले.

केबिनची आणि तपासलेल्या सामानाची कसून तपासणी केली, ज्यामध्ये कोणताही धोका नसल्याचे दिसून आले. आवश्यक तपासानंतर पोलिसांनी प्रवासी मनोज कुमार याला पुढील तपासासाठी स्थानीक पोलिसांच्या ताब्यात दिले. एअर इंडियाचे विमान त्याच्या वेळेनुसार रवाना झाले.