
अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट हिंदुस्थानात तब्बल 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. 2025 च्या अखेरपर्यंत ही भरती केली जाणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. कंपनीने नुकताच जानेवारी-मार्च 2025 चा तिमाही निकाल जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीने 7.45 टक्के महसूल वाढीसह 5.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा महसूल नोंदवला. या निकालानंतर कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस. यांनी या भरतीची माहिती आहे.
या भरतीमुळे हिंदुस्थानातील आयटी क्षेत्राला नवचैतन्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या भरतीत नव्या इंजिनीअर्संना नव्या नोकरीच्या संधी निर्माण होतील. आम्ही गेल्या दोन वर्षांत व्यवस्थापित सेवांच्या प्रकल्पांमध्ये लक्षणीय वाढ पाहिली आहे आणि या नव्या भरतीमुळे आम्ही आमच्या कार्यबलाला अधिक मजबूत करू शकू, असे रवी कुमार म्हणाले.
2024 मध्ये 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती
मार्च तिमाहीत कंपनीत 3 लाख 36 हजार कर्मचारी होते. त्यापैकी 85 टक्के कर्मचारी हे हिंदुस्थानात आहेत. कंपनीने 2024 मध्ये जवळवास 10 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 2025 मध्ये दुप्पट संख्या भरली जाणार आहे. कंपनीने 14 हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा कामांवर घेतले आहे. कंपनी तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे- फ्रेशर्सना नियुक्त करणे, एआयद्वारे उत्पादकता वाढवणे आणि मानवी भांडवल खर्च प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी वापर सुधारणे.