मुंबईत पाच दिवस थंडीचे! आठ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा

स्वेटर घालून कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनी.

मुंबईत पुढील पाच दिवस तापमान सरासरी 14 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने गारठा वाढणार आहे. राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली असून आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘थंडीच्या लाटे’चा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती मुंबई हवामान विभागाच्या सुष्मा नायर यांनी दिली.

मुंबईसह दोन्ही उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून पहाटे दाट धुके आणि गारठा वाढत असल्याचे समोर आले आहे. धुक्यामुळे रस्ते आणि महामार्गांवर दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. यातच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत कडाका वाढणार आहे. यामध्ये किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूरमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने ‘थंडीच्या लाटे’चा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील पाच दिवस तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून, त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी वाढ होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

अशी घ्या काळजी…

– सकाळी थंडी आणि धुके असल्यामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांनी पहाटे घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. धुक्याच्या वेळी वाहनांचे हेडलाईट आणि फॉग लाईट सुरू ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.