नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 39 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर घरगुती वापराच्या 14 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये करण्यात आलेली वाढ ही आजपासूनच म्हणजेच 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन ऑईलने दिली आहे. यामध्ये व्यायसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरमध्ये 39 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गॅस सिलिंडरच्या दरात चांगलाच फटका बसला आहे. 10 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ही1605 रुपयांवरून वाढून थेट 1644 रुपये एवढी झाली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1697.50 रुपये वाढली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 38 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 1817 वरुन 1855 एवढी झाली आहे. तर कोलकात्यामध्ये व्यावसायिक सिलिंडर 1764.50 रुपयांएवजी 1802 रुपयांना मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याची या वर्षातील ही पहिलीच वेळ नसून गेल्याच महिन्यात वाढ करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे दरमहिन्यात सिलिंडरच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीचा फटका नागरिकांना बसणार आहे.