९ वी ते १२ वी विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा पुनर्विचार करण्याकरिता समिती गठीत

324

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

इयत्ता ९ वी ते १२ वी विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा पुनर्विचार करण्याकरिता समिती गठीत केल्याचे शासन परिपत्रक आज मंगळवार ९ जुलै रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केले आहे. या समितीला १० दिवसात सीबीएसई व आयसीएसई, आय.बी. या मंडळाच्या तसेच राज्यमंडळाची विषय योजना, मुल्यमापन पद्धती यांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

मार्च २०१९ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन व्हावे, या हेतूने भाषा व समाजशास्त्र या विषयातील अंतर्गत मूल्यमापन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि अन्य मंडळामध्ये (उदा. सीबीएसई व आयसीएसई) विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सुरु आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन तसेच विषय रचना याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वी ची विषय रचना व मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये २९ जणांचा समावेश असून त्यामध्ये शिक्षण संचालक, उपसंचालक, मंडळाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या