दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे झालेल्या राष्ट्रकुल पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी हडपसरच्या चिंतामणी व कादंबरी राऊत या बंधू-भगिनीने सुवर्णपदक पटकाविले. चिंतामणीने विशेष मुलांच्या 93 किलो गटात, तर कादंबरीने मुलींच्या सबज्युनिअर 69 किलो गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत एकूण 97 देश सहभागी झाले होते. हिंदुस्थानातून 65 खेळाडू सहभागी होते. चिंतामणी राऊतने स्कॉटमध्ये 150 किलो, तर बेंचमध्ये 70 किलो डेड या प्रकारात 180 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. कादंबरीने स्कॉट प्रकारात जागतिक विक्रम नोंदविला. तिने 150 किलो वजन उचलून नवा विश्वविक्रम करताना गतवेळी दक्षिण आफ्रिकेच्या चेअंते मलदेर हिचा 145 किलोचा विक्रम मोडीत काढला. तिने स्कॉटमध्ये सुवर्ण, तर बेंचमध्ये 75 किलो वजन उचलून रौप्यपदकाची कमाई केली. याचबरोबर डेड प्रकारातही 140 किलो वजन उचलून तिने आणखी एक रौप्यपदक जिंकले.