परीक्षेतील गुणांवर भरपाई ठरू शकत नाही, हायकोर्टाने अपघात दावा न्यायाधिकरणाचा निकाल केला रद्द; पीडिताच्या कुटुंबाला दुप्पट रक्कम देण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीडिताला परीक्षेत कमी गुण मिळाले होते याचा अर्थ भविष्यात त्याची चांगली कमाई झाली नसती असा तर्क लावून मोटार अपघाताची भरपाई ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

हा निर्वाळा देत न्या. मिलिंद साठे यांच्या एकल पीठाने एका पीडिताच्या कुटुंबाला भरपाईची रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले. अपघात दावा न्यायाधिकरणाने या कुटुंबाला 21 लाखांची भरपाई मंजूर केली होती. ती रद्द करत न्यायालयाने 46 लाख रुपये या कुटुंबाला देण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी

या प्रकरणात एका वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्याला शेवटच्या परीक्षेत 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले होते. परिणामी भविष्यात त्याने महिना 20 हजार रुपये कमाई केली असती, असे निरीक्षण नोंदवत अपघात दावा न्यायाधिकरणाने या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 21 लाख भरपाई मंजूर केली. याला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते.

अधिक कमाईची शाश्वती नसते

परीक्षेत चांगले गुण मिळवणारा कधी-कधी चांगली कमाई करत नाही. मात्र कमी गुण मिळवणाऱ्याचे उत्पन्न बहुतांश वेळा अधिक असते. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याने भविष्यात कमी पैसे कमवले असते असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.