
अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा असणार आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी म्हाडा तांत्रिक निविदा खुली करणार असून त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची वित्तीय निविदा खुली करण्यात येईल. त्यानंतर विकासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
अभ्युदय नगरला सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फुटांची 3410 घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासाची बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडाने सुरुवातीला गेल्या वर्षी निविदा काढली होती. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घराचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, अशी अट म्हाडाने घातली होती. सहा वेळा मुदतवाढ देऊनदेखील एकाही विकासकाने निविदा भरली नाही. त्यामुळे म्हाडाने पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 635वरून 620पर्यंत कमी करत विकासक नेमण्यासाठी 29 मे रोजी नव्याने निविदा मागवल्या होत्या.




























































