
मिंधे गटाचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदार निधीमधून दोन अॅम्ब्युलन्स विकत घेऊन आपल्याच मालकीच्या संस्थेला दिल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली. संपूर्ण पुराव्यासह सदरील तक्रार/ फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सिल्लोडच्या सोयगाव येथे अब्दुल सत्तार व त्यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या मालकीची नॅशनल एज्युकेशन सोसायटी आणि प्रगती शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेला आमदार निधीमधून पाच अॅम्ब्युलन्स देण्यात आल्या, मात्र त्यासाठी नियमाप्रमाणे जिल्हा शक्य चिकित्सक, जिल्हाधिकारी व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची कोणतीही पडताळणी केली नाही, असा आरोप या पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.
असा झाला घोटाळा…
सर्व अॅम्ब्युलन्स जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावाने खरेदी करण्यात आल्या आणि सत्तार यांच्या संस्थांना हस्तांतरण करण्यात आल्या. त्या संस्थांना आरोग्य सेवेमध्ये अनुभव नाही किंवा त्यांचे कोणतेही रुग्णालय नाही.
नियोजन विभागाने विशेष बाब म्हणून अॅम्ब्युलन्सना मंजुरी दिली.
दोन्ही संस्थांना अॅम्ब्युलन्सची आवश्यकता आहे का याची पडताळणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांनी केली नाही.