
पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर झालेल्या प्रारूप मतदारयाद्यांचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला असून, नागरिक व इच्छूक उमेदवारांकडून तब्बल ५२ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रारूप मतदारयादी मिळवण्यासाठी ठराविक शुल्क आकारले गेले. मात्र, शुल्क भरूनही दुसऱ्यादिवशी शुक्रवारी अनेक इच्छूक उमेदवारांना याद्या मिळाल्याच नाहीत. यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, यामागे विशिष्ट पक्षाला लाभ मिळावा, यासाठी मुद्दाम याद्या रोखा कारभार राबवला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.
महापालिकेने चुकीच्या पद्धतीने मतदारयाद्या तयार केल्या आहेत. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची नावे, प्रभागांमध्ये उलटसुलट वाटप, मध्यवर्ती भागातील मतदारांची नावे शेजारच्या प्रभागांकडे ढकलणे, प्रत्यक्ष पाहणी न करणे, अशा प्रकारच्या तक्रारींनी पालिका निवडणूक व्यवस्थेवर बोट ठेवले आहे. एवढेच नव्हे तर मतदारयाद्या चुकीच्या पद्धतीने तोडल्या, प्रभागांच्या सीमांचा फज्जा केला आणि प्रत्यक्ष पाहणी न करता कागदोपत्रीच ‘खापरफोड’ करून याद्या तयार केल्याचा आरोप इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
निवडणूक विभाग पहिल्या टप्प्यातच
‘फेल’! मतदारयादी ही निवडणुकीची पहिली पायरी; पण या पायरीवरच प्रशासन ठेच खात असल्याने लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रभागांच्या सीमांची बेबंद रेखाटणी, चुकीची नोंदणी, गैरहजर अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आणि राजकीय मॅनेजमेंट, यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.
हरकतींची संख्या
पालिका निवडणूक कार्यालय : 3 क्षेत्रीय कार्यालये : 49 एकूण हरकतीः 52
नावे उलटसुलट – प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘मतदारयाद्यांमध्ये अक्षरशः अव्यवस्था आहे. आपल्या प्रभागाच्या मध्यभागातील नावे थेट शेजारच्या प्रभागात टाकली आहेत. हे जाणूनबुजून करण्यात आले आहे. प्रत्येकाने मतदारयादीचे बारकाईने परीक्षण करणे, ही वेळेची गरज आहे.’
कागदोपत्री खेळ – उज्ज्वल केसकर महापालिकेतील काही सहायक आयुक्तांना पुण्याची माहितीच नाही. प्रभागरचनेनुसार याद्या तयार करण्याऐवजी कागदोपत्री खेळ केला गेला आहे. जे मतदार त्या भागात राहतच नाहीत, त्यांची नावे तिथे नोंदवली आहेत. हे मोठे षडयंत्र असून, त्याविरुद्ध आम्ही लढा देणार असल्याचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी नमूद केले.
हरकतींसाठी मुदत वाढवा – संजय बालगुडे याद्या वेळेवर न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक उमेदवारांना हरकती सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. पैसे भरूनही याद्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे हरकती दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे.





























































