
महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई महापालिकेने बँकेत 90 हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. हा पैसा मुंबईकरांच्या कष्टाचा व हक्काचा आहे, परंतु भाजप महायुतीने विकासाच्या नावाखाली फक्त लूट सुरू केली आहे. मागील 3 वर्षे 9 महिन्यांच्या ‘प्रशासक राज’मधून महायुतीने मुंबई पालिकेच्या तब्बल 12 हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.
मुंबई महापालिकेत महायुतीने ‘प्रशासकराज’ बसवून महापालिका लुटण्याचे काम केले आहे. 2021-22 मध्ये महानगरपालिकेच्या विविध बँकांमध्ये 91 हजार 690.84 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यातून 12 हजार 192 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. शहरातील विकासकामांसाठी हा निधी वापरला जात असल्याचा सत्ताधारी दावा करत आहेत. पण त्यांचा हा दावा फोल असल्याचे मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या.
जागेजागी रस्ते खोदून ठेवले आहेत, एकही रस्ता सुस्थितीत नाही. सहा महिन्यांत ‘मुंबई खड्डेमुक्त’ करण्याची वल्गना केली होती ती कुठे गेली?
महानगरपालिकांच्या शाळा खासगी संस्थांना दिल्या जात आहेत. महायुतीने मुंबई बकाल करून ठेवली आहे.
मुंबई महापालिकेत फक्त काही पंत्राटदारांचे व बिल्डरांचे राज्य आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, कंत्राटदार व बिल्डर यांची भ्रष्ट युती मुंबईकरांच्या पैशावर दरोडा टाकत आहे.
आरोग्य सुविधांची वानवा
कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करूनही मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. आम्ही महानगरपालिकांच्या रुग्णालयांना भेटी दिल्या असता तेथे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफची अपुरी संख्या दिसून आली, औषधांचा तुटवडा आहे, मुंबईतील सर्वसामान्य जनतेला उपचार मिळत नाहीत. आरोग्य विभागाचे बजेट कोणाच्या खिशात जाते? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.



























































