पवईतील झोपडपट्टीवरील कारवाईची न्यायालयीन चौकशी करा- काँग्रेसची मागणी

मुंबई महापालिकेच्या पथकाने 6 जूनला रात्री पवई येथील भीमनगर झोपडपट्टीवर कारवाई करून 800 कुटुंबांना रस्त्यावर आणले. 1 जूनला नोटीस देऊन पोलिसांच्या बंदोबस्तात झोपडपट्टी तोडण्यात आली. पावसाळय़ात 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात झोपडपट्टय़ांवर कारवाई करू नये, हा सरकारी नियम असतानाही ही कारवाई का करण्यात आली, सरकार कोणासाठी काम करत आहे, असा सवाल करत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, या सर्वांना तात्पुरत्या निवाऱयाची, जेवण, शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही केली.