पंतप्रधान मणिपूरला कधी जाणार? मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर काँग्रेसची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट कधी देणार? युक्रेनचा दौरा सुरु करण्यापूर्वी किंवा नियोजित दौऱ्यानंतर ते जातीय हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार का? असा सवाल करीत जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाले जयराम रमेश

जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, मणिपूरचे मुख्यमंत्री नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले. मणिपूरची जनता थेट प्रश्न विचारत आहे कि, ‘मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी नरेंद्र मोदींशी स्वतंत्र भेट घेऊन मणिपूरच्या हिंसक स्थितीबाबत चर्चा केली का?’ अशा शब्दांत जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र डागले आहे.

एन. बिरेन सिंह यांनी नरेंद्र मोदींना युक्रेन दौऱ्यापूर्वी किंवा नंतर मणिपूरला भेट देण्याचे निमंत्रण दिले का? असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे. मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार धगधगत आहे. असे असताना मोदींनी अद्याप हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचा दौरा केलेला नाही. त्यावरून काँग्रेसने मोदींवर सातत्याने हल्लाबोल सुरु ठेवला आहे.

24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट युक्रेनच्या दौऱ्यावर चालले आहेत. यावेळी ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.