पंतप्रधान मोदींनी चीनला क्लीन चीट दिली, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून तेथे ते एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या या चीन दौऱ्यावरून काँग्रेसने टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना विसरले आणि हसतमुखाने चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन केले अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.

जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, चीनने गलवान खोऱ्यात आपल्या 20 शूर जवानांचा जीव घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीन पाकिस्तानला उघडपणे साथ देत होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानला थेट माहितीही पुरवत होता. चीनच्या या नापाक कृत्यांवर नरेंद्र मोदींनी कडक पाऊल उचलण्याऐवजी हसतमुखाने चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन केले.

तसेच जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील चीनी आक्रमणात आपल्या 20 सर्वात शूर जवानांनी प्राणाची आहुती दिली. तरीसुद्धा, 19 जून 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी चीनला क्लीन चिट दिली. रमेश म्हणाले की, 4 जुलै रोजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानसोबत चीनच्या संगनमताबाबत ठाम आणि स्पष्टपणे मांडणी केली. पण या अभद्र युतीवर ठोस प्रतिक्रिया देण्याऐवजी मोदी सरकारने ते नियती मानून गप्प बसण्याचा मार्ग निवडला आणि आता चीनला राजकीय दौऱ्यांनी पुरस्कृत करत आहे असेही जयराम रमेश म्हणाले.