
हिंदुस्थान आणि पाकिस्तान शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून कशी झाली? असा सवाल काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी X वर एक पोस्ट करत हा सवाल उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीवरवरून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
युद्धबंदीच्या घोषणेवरून जयराम रमेश यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी दिल्लीने कश्मीर मुद्द्यावरील आपले धोरण बदलले आहे का? कश्मीर प्रश्नावर सरकारने तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली आहे का? आणि पाकिस्तानसोबत राजनैतिक मार्ग उघडले आहेत का? तसेच हिंदुस्थानने शिमला कराराचा त्याग केला आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले आहेत की, “पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या हिंदुस्थान-पाकिस्तान करारात अमेरिकेची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस पुन्हा एकदा करत आहे.”
ते म्हणाले आहेत की, “आपण शिमला कराराचा त्याग केला आहे का? आपण तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीसाठी दार उघडले आहे का? काँग्रेस विचारू इच्छिते की, हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत राजनैतिक मार्ग उघडले आहेत का? आणि जर तसे असेल तर त्याच्या अटी काय आहेत?”