अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही ते आता फोटो काढत आहेत. मात्र, धरण व कालवे कोणी केले, हे जनतेला माहीत आहे. संगमनेर तालुक्याची राजकीय संस्कृती ही चांगली आहे. येथे भेदभाव नाही. मात्र, काही मंडळी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा काँगेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब ओहोळ होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, ऍड. माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजित थोरात, संतोष हासे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, निळवंडे धरण व कालवे आपण केले आहेत. ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ हा आदर्शवत पॅटर्न राबवताना प्रकल्पग्रस्तांना सन्मान दिला. संगमनेर तालुक्यात त्यांना जमिनी दिल्या. या कामात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची मदत झाली. याउलट आज जे फोटो काढत आहेत, त्यांची कुठलीही मदत नाही. इंचभर जमीन त्यांनी दिली नाही की एक मुलगा कामाला घेतला नाही. निळवंडे कोणी केले, हे सर्वांना माहीत आहे, असे ते म्हणाले.
जनतेचे प्रेम असल्यामुळे राज्यात आपला सन्मान होतो, हे काहींना पाहवत नसल्याने ते सातत्याने संगमनेर तालुक्यात विष कालवण्याचा प्रयोग करत आहेत. अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. 54 कार्यकर्त्यांवर खोटय़ा गुह्यांतून केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. दहशत निर्माण करू पाहत आहेत. मात्र, जनतेच्या पाठिंब्यामुळे त्यांचा बंदोबस्त आपण करू, असा इशारा आमदार थोरात यांनी दिला.
दरम्यान, आपण पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिलो. तत्त्व जपली. सत्तेसाठी कधीही कोलांटउडय़ा मारल्या नाहीत. या एकनिष्ठतेची दखल घेऊन देशपातळीवर सर्वोच्च समितीत काम करण्याची संधी मिळणे, हा संगमनेरकरांचा सन्मान असल्याचे काँग्रेस नेते आमदार थोरात यांनी म्हटले आहे.