सरकार सत्ताधारी असंवैधानिक आमदार जपतेय!

‘बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सरकार संवेदनशील नाही. शाळा कोणाची, ट्रस्टी कोण याची चौकशी झाली नाही. सरकार केवळ सत्ताधारी असंवैधानिक आमदार जपण्याचे काम करीत आहे,’ असा हल्लाबोल काँग्रेस नेते-आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. ‘लोकसभेप्रमाणे विधानसभेतदेखील पक्षाला चांगले यश मिळेल. पक्षात काही अंतर्गत प्रश्न असतील तर दिल्ली, मुंबईचे वरिष्ठ विश्वासात घेऊन निर्णय घेतील,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींवर अन्याय होताना सरकार कोठेच दिसत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. बदलापूरच्या ज्या शाळेत हे प्रकरण घडले, ती शाळा कोणाची होती? या शाळेचे पदाधिकारी, ट्रस्टी कोण आहेत? ही घटना घडलीच कशी? याबाबत अद्यापि तपास झालेला नसून, त्यांना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होऊन हा खटला जलद गती न्यायालयात चालवून दोषीला फाशीची शिक्षा व्हावी,’ असे मत डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

‘सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांच्यात जुंपली आहे. याबाबत विचारले असता, सांगली जिह्यात काँग्रेस एकसंघ आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनतेच्या पाठिंब्यावर चांगले यश मिळेल,’ असा विश्वासही आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींना जनतेबाबत कळवळा नाही

‘जळगावमधील 24 लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले. त्यानंतरही लगेच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे. ही सभा आठ दिवसांनी घेतली असती तरीही चालले असते; पण त्यांनी तसे न करता तत्काळ सभा घेतली. यावरून मोदी यांना जनतेविषयी किती कळवळा आहे, हे दिसून येते,’ अशी टीकाही आमदार विश्वजित कदम यांनी केली.