अग्निवीरांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही?, राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न

नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत लष्कराकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याच घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढीलप्रमाणे तीन प्रश्न विचारले आहेत. तसेच अग्निवीर योजनेविरोधातील ‘जय जवान’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही देशातील तरुणांना केले आहे.

ज्याप्रमाणे कोणत्याही शहीद जवानाला आर्थिक मदत दिली जाते, त्याप्रमाणे गोहिल आणि सैफतच्या कुटुंबीयांना वेळेवर भरपाई मिळेल का?
अग्निवीरांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि बलिदान समान आहे, तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का?
अग्निपथ योजना ही लष्कराबरोबर अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का?