राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार यावे! काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे साईबाबांना साकडे

राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार यावे, असे साकडे साईबाबांना घातले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळणार आहे, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे रमेश चेन्नीथला आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार लहू कानडे, करण ससाणे, हेमंत ओगले, सचिन चौगुले, सचिन गुजर आदी उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला म्हणाले, बुधवारी मविआची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होईल. राज्यात 288 जागांवर काँग्रेस मजबूत आहे. मात्र, आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन पुढे जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतर उमेदवार ठरवले जातील. महाविकास आघाडी आता एकजूट होऊन काम करणार आहे. जागावाटपावरून कोणतीही ओढाताण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील वातावरण महायुतीविरोधात असून, जनतेला हे सरकार नको आहे. देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्यात झाला आहे. अजित पवार भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर घोटाळे संपले का, असा टोला लगावत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळणार आहे, असे ते म्हणाले.