धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या केंद्रातील अहंकारी सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. महिला असुरक्षित आहेत का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर धाक राहिला नसून राज्य सरकारचा कारभार भ्रष्टाचारी झाला असल्याची टीका थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.
सततच्या विकास कामामुळे संगमनेर तालुका हा राज्यात सर्वात चांगला तालुका म्हणून ओळखला जातो. सहकार, शिक्षण, राजकारण शेती यामुळे संगमनेरची राज्यात लौकिकास्पद तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. सध्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. सत्ताधार्यांचे लक्ष वेगळ्या कामावर असल्याने प्रशासनावर धाक नाही. निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. स्वायत्त संस्था दबावाखाली आहेत, असेही थोरात म्हणाले.
सरकारी पैशाने मेळावे घेतले जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे. हे सर्व आपल्याला बदलायचे आहे. राज्यभरात महाविकास आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येणारे सरकार हे आपलेच असून जनसामान्यांच्या विकासाकरता आपण कायम काम केले. कधीही कुणाची अडवणूक केली नाही. याउलट शेजारचे काही लोक येऊन आपल्या तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना थारा देऊ नका असे आवाहनही थोरात यांनी केले.
खराडी येथे दत्त व वेडूवाई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवीन पाण्याच्या टाकीचे पूजनही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका – आमदार तांबे
राज्य सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांनी या योजना अगोदर का आणल्या नाहीत? फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना आणल्या आहेत. मागील अडीच वर्षे महागाई वाढवली. हे जनतेचे पैसे आहेत. सध्या राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज या सरकारने केले आहे. या सरकारला खाली खेचा असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.