काँग्रेसचा आज विधान भवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा; शेतकऱयांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात विधिमंडळात दोन हात करणाऱया काँग्रेस पक्षाने आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार काँग्रेसने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱयांच्या प्रश्नांवर उद्या (सोमवारी) हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही. सरकार मदतीच्या कोरडय़ा घोषणा करत आहे. तरुणांना नोकऱया नाहीत आणि आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे. पण भाजपप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वाऱयावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजप आणि फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा येत्या 11 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

शेतकऱयांना तातडीने मदत द्यावी, सरकारी सेवेत कर्मचारी भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

विधान भवनावर आज धडकणार तब्बल 14 मोर्चे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे विविध मागण्यांसाठी दीक्षाभूमी येथून मोर्चा निघणार आहे. यासह यशवंत स्टेडियम येथून विदर्भ ज्वाइंट एक्शन कमिटीतर्फे तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती वर्धातर्फे आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हे 4 मोर्चे मॉरिस कॉलेज पॉइंट येथे थांबवण्यात येतील. यशवंत स्टेडियम येथूनच महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ, विदर्भ प्रदेश अखिल हिंद ब्लॉक व विदर्भ राज्य जन जनार्धन किसान सेल, ऑल महाराष्ट्र फेयर फ्राईज शॉपकीपर्स फेडरेशन पुणे, सकल धगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन जालना, ठगी पिडी जमाकर्ता परिवार आणि समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघातर्फे मोर्चे निघणार आहेत. हे 7 मोर्चे टेकडी रोड पॉइंटवर थांबविण्यात येतील. इंदोरा मैदान येथून जनसेवा गोंडवाना पार्टीचा मोर्चा आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा एलआयसी चौक येथे अडविण्यात येईल. मंगळवारी बाजार येथून निघणारा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा मोर्चा लिबर्टी टॉकीज चौक येथे थांबविण्यात येईल.