महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. मात्र, आज महाराष्ट्रात महिला, चिमुकल्या सुरक्षित नाहीत. भाजपच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली असून, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार वाढले आहेत. कायदे बनवले आहेत; परंतु महिला पुढे येण्याचे धाडस करीत नाहीत. बदलापूर घटनेनंतर पोलीस एफआयआर दाखल करून घेत नव्हते. दिल्लीमध्ये कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत. आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, असे खडे बोल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सुनावले.
दरम्यान, महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील ‘इंदिरा महोत्सव’ हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे. महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा महोत्सव आहे, असेही प्रणिती शिंदे
यांनी सांगितले.
संगमनेर साखर कारखाना कार्यस्थळावर एकवीरा फाउंडेशन अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून इंदिरा महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, आयोजक डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, प्रभावती घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव आदी उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले, त्यामुळे महिलांना सर्वत्र काम करण्याची संधी मिळते आहे. तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. थोरात यांनी केले आहे.’
महिलांमध्ये समाज परिवर्तनाची सर्वांत मोठी ताकद असून, बचत गटाची मोठी चळवळ या तालुक्यात आहे. बचत गटातील महिलांसाठी विविध केंद्रीय योजना मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.
महिला स्वयंपूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न – आमदार थोरात
राजीव गांधी यांनी आरक्षण मांडले आणि त्यातून महिलांना विविध संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. बचत गटात अनेक महिला, भगिनी असून, त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी, यासाठी रोजगार स्वयंरोजगाराची संधी देण्याची ही सुरुवात आहे, असे काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग नोंदवला.