फोडाफोडीच्या राजकारणामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसची टरकली

30

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कर्नाटक आणि गोव्यामध्ये भाजपने सुरु केलेल्या फोडाफोडीमुळे काँग्रेस पूर्णपणे हबकली आहे.या दोन राज्यात जे प्रयत्न झालेत ते काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानातही होण्याची दाट शक्यता असल्याने काँग्रेस अधिकच गर्भगळीत झाली आहे. इथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच आपल्या पक्षातल्या आमदारांच्याही हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.

भाजपने ज्या पद्धतीने कर्नाटक आणि गोव्यातील आमदार फोडले ते पाहता, त्यांनी पारंपरीक पद्धती बाजूला ठेवत नव्या मार्गांनी आमदारांना आपल्या गळाला लावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हे पाहिल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दोन राज्यांमधील सत्ता अबाधित रहावी यासाठी इथली काँग्रेस अत्यंत सतर्क झाली आहे.

राजस्थानच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस जास्त टेन्शनमध्ये आहे. 2018 साली इथे निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस 114 जागांवर तर भाजप 109 जागांवर विजयी झाली होती. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा असून इथे बहुमतासाठी 116 चा आकडा गाठणं गजरेचं आहे. काँग्रेसने इथे सपाचा 1 आमदार, बसपाचे 2 आमदार आणि 4 अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. जर इथे भाजपने काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडला शिवाय सपा आणि बसपाचे आमदारही फोडले तर काँग्रेसचे सरकार पडेल आणि भाजप तिथे सरकार बनवू शकेल.

राजस्थानमध्ये काँग्रेसला 100 जागांवर तर भाजपला 73 जागांवर विजय मिळाला आहे. इथला बहुमताचा आकडा 101 असून इथे काँग्रेसने जवळपास 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार स्थापन केलं आहे. या दोन राज्यांमध्ये देखील भाजप गडबड करू शकतो याची काँग्रेसला पूर्ण खात्री आहे. भाजपने सुरू केलेलं फोडाफोडीचं हे राजकारण लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसने गुरुवारी संसद परिसरात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या