Mallikarjun Kharge – भाषण करत असताना मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडली, मंचावर कोसळले

जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अचानक तब्येत बिघडली. भाषण करत असतानाच खरगे चक्कर येऊन मंचावर कोसळले. कठुआ जिल्ह्यातील जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे आयोजित सभेमध्ये ही घटना घडली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही पळापळ सुरू झाली. मंचावर उपस्थित नेत्यांनी खरगे यांना आधार दिला. त्यानंतर अस्वस्थ वाटत असतानाही खरगे यांनी आपले भाषण सुरू ठेवले. खरगे यांनी बसूनच उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

मी 83 वर्षांचा असून इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवत नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन, असे खरगे यावेळी म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढत राहू, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारला जम्मू-कश्मीरमध्ये कधीही निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोटने चालणारे सरकार त्यांना हवे होते, असा आरोपही खरगे यांनी यावेळी केला. मोदींनी 10 वर्षात देशातील तरुणांना काहीही दिले नाही. 10 वर्षात तुम्हाला समृद्ध करू न शकणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार का? असा सवालही खरगे यांनी उपस्थितांना केला. तसेच याचा जाब भाजप नेत्यांना विचारा असेही ते म्हणाले.

प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, विदेशातून काळा पैसा परत आणू, प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख टाकू ही आश्वासनं मोदींनी पूर्ण केली नाहीत. जो व्यक्ती खोटं बोलतो त्याला जनता कधीच माफ करत नाही. जम्मू-कश्मीरची जनताही मोदींना कधी माफ करणार नाही, असेही खरगे यावेळी म्हणाले.

दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यातील मतदान 3 ऑक्टोबर रोजी होणार असून 8 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल.