
भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने बंडखोरांवर माघारीसाठी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याच्या तक्रारी असतानाच आज मुदत संपल्यानंतरही माघारीचे अर्ज स्वीकारा, असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना गेल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातील अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम प्रयत्नशील होते. तरीही अनेक बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले नाहीत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली आहे. मात्र बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी दुपारी तीनच्या नंतरही जोरदार प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरा अर्ज मागे घेतले तरी बंडखोरांचे माघारीचे अर्ज स्वीकारा मात्र हे अर्ज दुपारी तीन वाजण्यापूर्वी स्वीकारल्याचे दाखवा, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱयांना ‘वरून’ आल्याची काही सरकारी अधिकाऱयांची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत यांनीही त्याबाबत दावा केला.
आयोगावर प्रचंड दबाव
निवडणूक अधिकाऱयांवर प्रचंड दबाव आहे. हे कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांवर टाकलेल्या दबावामुळे स्पष्ट झाले आहे. माघारीचे उमेदवारी अर्ज तीन वाजण्याच्या मुदतीनंतर स्वीकारण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिले आहेत अशी माहिती आमच्याकडेही येत आहे. या माहितीची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते सचिन सावंत यांनी केली आहे.




























































