
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गायींच्या कत्तली वाढल्या असून भाजपच्या राजवटीत गोमांस जीएसटीमुक्त करण्यात आले आहे. गायीच्या नावावर मते मागायची आणि निवडून आल्यानंतर गोहत्येला प्रोत्साहन द्यायचे, हेच भाजपचे धोरण राहिले आहे, असा हल्ला मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी चढवला.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे स्वतःला गोभक्त म्हणवून घेतात. परंतु त्यांच्याच राज्यात सर्वात जास्त गायींची दिवसाढवळ्या कत्तल होत आहे, भाजप याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पटवारी यांनी केला. मला शिव्या देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन करावे. काँग्रेस प्रत्येक गोशाळेत जाऊन तपासणी करेल. गोशाळेत किती गायी होत्या आणि आता किती राहिल्या आहेत, हे पाहण्याचे काम करेल, असे ते म्हणाले.