
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘अजित पवार हाय हाय’, ‘पालकमंत्री हाय हाय..’ अशी तुफान घोषणाबाजी केली. अजित पवार पालकत्वाची भुमिका पाळत नाही असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
यावरून महाराष्ट्रातील काँग्रेसने महायुतीवर जोरदार टीका केली आहे. ”फोडाफोडीचं राजकारण करून एकत्र आलेल्या महायुतीची आता महाफुटी होण्याच्या मार्गावर आहे, लोकसभेच्या निकालामुळे पुरते घाबरलेले नेते विधानसभेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अंतर्गत खेळी करत आहेत.. आज जुन्नरमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्या आशा बुचकेंसहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले असल्याचा आरोप करत’ काळे झेंडे दाखवले.. महायुतीतील धुसफूस हळूहळू चव्हाट्यावर यायला लागली आहे”, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवरून केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा जुन्नर तालुक्यात पोहोचली असता महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला. नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले. शासकीय कार्यक्रम घेऊनही घटकपक्षांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला.