
महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर करून गवगवा केला, पण महायुती सरकारच्या 100 दिवसांत राज्याला फक्त ‘आका आणि खोके’ हे दोन शब्द मिळाले, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टीका केली.
परळीतील गांधी स्मृतिस्तंभ येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना यात्रा काढण्यात आली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिलेल्या सरकारने आता ‘आम्ही असा शब्द दिलेला नाही’ असा पवित्रा घेतला आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे लांबच, पण दीड हजार रुपयेही दिले जात नाहीत. निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. अवघ्या 100 दिवसांत भाजप महायुतीने जनतेची घोर फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. दरम्यान, उद्या (रविवार) आणि सोमवारी काँग्रेसच्या वतीने परभणीमध्ये सद्भावना आणि संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहे.