
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपमध्ये आज पुण्यात जोरदार राडा झाला. ईडीच्या आडून केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवून रोष व्यक्त केला.
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात ईडीच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेल्या सुडाच्या राजकारणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांचा दबाव झुगारून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट खडकी रेल्वे स्थानक गाठले आणि रुळावरून बस्तान मांडले. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही, असा इशारा राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे, शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले
राहुल गांधी-सोनिया गांधी यांना अटक करा, अशी मागणी करत भाजप समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार राडा झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखले.