
महिला म्हटले की सौंदर्याचा विषय येतोच. आपण सुंदर कसे दिसू याची नियमित काळजी महिला घेतात. सौंदर्य जपण्यात कुठलीही हयगय न करणाऱया महिला असतात. अशाच एका महिलेने हेअरकट आवडला नाही म्हणून सलून कंपनीविरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगापर्यंत कायदेशीर लढा दिला. आयोगाने तिला 2 कोटींची भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाला सलूनचे व्यवस्थापन हाताळणाऱया आयटीसी लिमिटेड कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ब्युटी सलूनकडून हेअरकट कापताना चूक झाल्याचा आयोगाचा निष्कर्ष कायम ठेवला. तथापि, तक्रारदार महिलेला 2 कोटींऐवजी 25 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. ज्या वेळी कोटय़वधी रुपयांच्या भरपाईचा दावा केला गेला असेल त्या वेळी तो दावा सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे आवश्यक असतात, असे निरीक्षण न्यायमूर्ती राजेश बिंदाल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने नोंदवले.

























































