ठेकेदारावर करोडोंची दौलतजादा; तरी कल्याण पूर्वेत कचऱ्याचे डोंगर, सुमित एल्को कंपनीची दुसऱ्याच दिवशी पोलखोल

स्मार्ट सीटी म्हणून ओळख असलेल्या कल्याण शहराची पुरती कचराकोंडी झाली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने मोठा गाजावाजा करत ‘सुमित एल्को’ ही ठेकेदार कंपनी नेमत त्यांच्यावर करोडोंची दौलत उधळली. मात्र या कंपनीला ठेका मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कल्याण पूर्वेत कचऱ्याचे डोंगर दिसत होते. दुर्गंधीने नागरिकांचे डोके भणाणून गेले होते. जनतेचा पैसा खिशात घातलेल्या ठेकेदाराचे कचरा उचलणारे कर्मचारी दिसत नसल्याने लाडक्या ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्यासाठी त्याला ठेका दिला आहे काय, असा संतप्त सवाल कल्याणवासी विचारत आहेत.

कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर परिसर, पुना – लिंक रोडवरील ‘ड’ प्रभागाजवळचा रस्ता आणि हॉटेल प्रसादशेजारील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. रविवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेन ‘चेन्नई पॅटर्न’च्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा वापर करून कचरा व्यवस्थापन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सुमित एल्को या कंपनीकडे कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विधानसभा क्षेत्रांतील (डी, ई, एफ, जी, एच, आय, जे) या सात प्रभागांतील कचरा संकलन, वाहतूक आणि रस्तेसफाईची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आश्वासने हवेतच
तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतील, दररोज घराघरातून कचरा उचलण्यात येईल, पॉवर स्वीपर मशिन्स, प्रशिक्षित कर्मचारी आणि अत्याधुनिक साधनसामग्री वापरली जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले होते. शिवाय तक्रारी नोंदवण्यासाठी मोबाईल अॅप, सोशल मीडिया आणि इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटर तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ठेक्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. त्यामुळे कंपनीने दिलेली आश्वासने हवेत विरून कचरा व्यवस्थापकाचा चेन्नई पॅटर्न डब्यात गेल्याचे दिसले.

जर एवढा मोठा ठेका दिल्यानंतरही शहरात अशी अवस्था असेल तर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच झाली. महापालिकेने कंपनीकडून काम सुरू करताना मोठा गाजावाजा केला. पण प्रत्यक्षात नागरिकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. या कंपनीकडून करोडो रुपये खर्चुन गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात नसेल तर अशा कंपन्यांना ठेका देण्याचा काय उपयोग.
– विजय भोसले, अध्यक्ष, सहयोग सामाजिक संस्था.