
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केला आहे, अशी धक्कादायक माहिती राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दिली.
अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. कोरटकरच्या पत्नीने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केला. या मोबाईलमधील सर्व डाटा करण्यात आला होता. याचा अर्थ कोरटकर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो, असेही मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठाच्या निदर्शनास आणले.
कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करताना कोल्हापूर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही. पोलिसांचे म्हणणे ऐकल्यावरच कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरच्या जामिनावर निर्णय द्यावा, अशी मागणी अॅड. वेणेगावकर यांनी केली.
काय आहे प्रकरण?
‘छावा’ चित्रपटावर इतिहास अभ्यासक सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर कोरटकरने इतिहास अभ्यासक सावंत यांना पह्न करून धमकावले होते. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी कोल्हापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. यात कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याविरोधात राज्य शासनाने अपील याचिका केली होती.
कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार
पोलीस संरक्षण असतानाही फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व अंतरिम जामिनाची मुदत आज संपली. आज न्यायालयात सुनावणी पार पडली. कोरटकरला प्रत्यक्ष हजर करायचे की नाही, यावर उद्या (दि. 12) सुनावणी होऊन निर्णय होणार आहे. दरम्यान, कोरटकरसारखा चिल्लर माणूस पोलिसांना का सापडत नाही? पोलीस असमर्थ आहेत का?’ असा सवाल इंद्रजित सावंत यांनी केला आहे.