वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना सज्जड दम, मंत्रिमंडळात सुनावले खडेबोल

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. सरकारची प्रतिमाही यामुळे मलिन होत आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले असून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सहकारी मंत्र्यांना सज्जड दम दिल्याचे वृत्त आहे.

महायुती सरकारमधील अनेक मंत्री, आमदार सध्या वादात अडकले आहेत. काहींचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, तर काही आपल्या चुकीच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. यावरून विरोधकही आक्रमक झालेले असून अशा वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचीही मागणी होत आहे. अशातच मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसोबत विशेष बैठक घेत कडक शब्दात सूचना दिल्या.

मंत्री वारंवार वादात अडकले आणि त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही शेवटची संधी असून वादग्रस्त विधाने खपून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला. वादग्रस्त विधाने टाळा आणि माध्यमांशी गरज असेल तरच संवाद साधा. तसेच वादग्रस्त कृती घडली तर त्याचे तात्काळ स्पष्टीकरण द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दादा भुसेंचे जावई, मिंध्यांच्या वरदहस्ताने प्रमोशन; पालिका आयुक्तपदाचा चार्ज सोडताच अनिलकुमार पवारांवर ईडीची धाड

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही नोटांनी भरलेल्या बॅगेसह एक व्हिडीओ समोर आला होता. एवढेच नाही तर मंत्री भरत गोगावले हे देखील वादात अडकले आहेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत बार असल्याचे प्रकरणही समोर आले होते. तसेच हनी ट्रॅपमध्येही सरकारमधील काही मंत्री, आमदार अडकलेले आहेत. यामुळे सरकारची बदनामी होत असून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळत असल्याची उद्विग्न भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

देवेंद्रजी, कधी घेताय योगेश कदमांचा राजीनामा, अनिल परबांनी दिले सर्व पुरावे

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा गोष्टी होत राहिल्या तर सरकारची बदनामी होते. विरोधकांच्या हातात आयते कोलीत देऊ नका. ही शेवटची संधी आहे. वादग्रस्त कृती सहन केली जाणार नाही. त्यावर आवश्यक ती कारवाई करू’, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!