
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजातील नागरिकांवर खुलेआम सुरू असलेल्या हल्ल्यामुळे हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुश्तफिजूर रहमान आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळणार असल्याने हिंदुस्थानी नागरिकांचा संताप आणखी अनावर झाला आहे. हिंदुस्थानच्या क्रीडा धोरणानुसार बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्यावर किंवा बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यावर कोणतीही बंदी नाही. अशी बंदी केवळ पाकिस्तानच्या संघ व खेळाडूंवर लागू आहे, असे स्पष्ट करीत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हात झटकले आहेत. मुश्तफिजूर रहमानला आगामी आयपीएलमध्ये खेळू द्यायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआयचा आहे, असे सांगत सरकारने चेंडू ‘बीसीसीआय’कडे ढकलला आहे.
‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱयाने सांगितले की, ‘हा निर्णय आमच्या हातात नाही. बांगलादेशी खेळाडूंना लीगमध्ये खेळण्यापासून रोखण्याबाबत सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही यावर अधिक काही बोलू शकत नाही.’ बांगलादेशमध्ये हिंदूंवरील कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुश्तफिजूर रहमानच्या आयपीएलमधील सहभागाला विरोध होत आहे. बांगलादेशच्या या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले आहे. त्यामुळे या संघाचा मालक बॉलीवूड किंग शाहरुख खानवरही टीकेची झोड उडाली आहे. गेल्या 13 दिवसांत तेथे तीन हिंदूंची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाणार आहे.
मुश्तफिजूर रहमानच्या विरोधात कोण काय म्हणाले?
आनंद दुबे ः शिवसेनेचे प्रवत्ते आनंद दुबे यांनी बांगलादेशी खेळाडूंना हिंदुस्थानात आयपीएल खेळण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. ‘संपूर्ण देश बांगलादेशबाबत संतप्त असताना त्या देशाच्या खेळाडूला संघात ठेवू नये,’ असे ते म्हणाले.
देवकीनंदन ठाकूर ः कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी शाहरुख खान यांनी माफी मागावी आणि मुश्तफिजूर रहमानला दिले जाणारे 9.2 कोटी रुपये पीडित कुटुंबांना द्यावेत, अशी मागणी केली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
संगीत सोम ः भाजप नेते संगीत सोम यांनीही मुश्तफिजूर रहमानच्या खरेदीवर टीका करत ‘पाकिस्तानचा खेळाडू हिंदुस्थानात खेळू शकत नसेल तर बांगलादेशचा कसा काय खेळू शकतो?’ असा सवाल उपस्थित केला.
केकेआरचा सर्वांत महागडा खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) अबुधाबीतील आयपीएल मिनी लिलावात मुश्तफिजूर रहमानला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे तो आयपीएलमधील आजवरचा सर्वांत महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला आहे.
मागील हंगामातील कामगिरी
मागील हंगामात रहमानने दिल्लीकडून तीन सामने खेळत चार विकेट्स घेतल्या होत्या. मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत त्याला संघात संधी देण्यात आली होती.




























































